केटरिंग कर्मचाऱ्यांचीही अरेरावी : रेल्वे प्रशासनाकडे तक्रार
पुणे – डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमध्ये अळ्या सापडण्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्रवाशाने ऑम्लेटसोबत घेतलेल्या सॉस आणि ब्लॅक पिपर (काळी मिरी) पावडरमध्ये अळ्या सापडल्या. याबाबत संबंधित प्रवाशाने नुकतीच रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
पुण्यातील व्यावसायिक सागर काळे दि. 19 जुलै मुंबईहून पुण्याला परतत असताना त्यांनी दिलेल्या ऑर्डरमध्ये अळ्या सापडल्याचा प्रकार घडला. मात्र डेक्कन क्वीनमधील “आयआरसीटीसी’च्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील कर्मचाऱ्यांनी दखल न घेता अरेरावीची उत्तरे दिली. या प्रकाराबाबत “आयआरसीटीसी’ प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी बुधवारी तक्रार दिली.
“ऑम्लेटसोबत असणारा सॉस डिशमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये अळ्या दिसल्या. त्यातून सहा ते सात आळ्या बाजूला काढल्या. त्यानंतर पॅंट्री कारच्या व्यवस्थापकाला या अळ्या दाखविण्यासाठी त्यांनी व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना विरोध करण्यात आला. त्याचबरोबर चुकून हा प्रकार घडल्याचे कर्मचाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्यांनी तक्रार करण्यासाठी “तक्रार पुस्तक’ देखील उपलब्ध करुन दिले नाही,’ असे सागर काळे म्हणाले. याबाबत “आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार मिळाल्यानंतर तातडीने चौकशी करणार असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.