सातारा -मोटार वाहन कायद्यानुसार चार वर्षांवरील प्रत्येकाने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, पालिका, नगरपंचायत, शाळा, महाविद्यालये व इतर सर्व शासकीय यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सूचित करण्यात येते की, जनतेस मार्गदर्शन ठरावे या दृष्टीने आणि स्वतःच्या व सहप्रवाशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येता-जाता अथवा कोणत्याही अन्य कामांसाठी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.
मोटार वाहन चालवताना शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकाऱ्यांचे आद्यकर्तव्य आहे. दुचाकी वापरताना हेल्मेट घातले नसल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, नागरिक हे मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 चे उल्लंघन केल्यास, त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी जारी केला आहे.