मेढा – धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा, आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या आणि अन्य मागण्यांसाठी धनगर समाजाने मेढा, ता. जावळी येथे तहसील कार्यालयावर सोमवारी भव्य मोर्चा काढला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
धनगर समाजाचे नेते प्रवीण काकडे, शिवाजीराव गोरे, विलास शिंदे, राजू गोरे, रोहित ढेबे, प्रकाश खरात, अशोक शेडगे, करण आखाडे, प्रकाश आखाडे, कोंडिबा शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष ढेबे, समीर झोरे, लक्ष्मण आखाडे, जयराम काळे, विशाल शिंदे, भगवान आखाडे, भागोजी पाटील, गणपत ढेबे आणि शेकडो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
मोर्चाच्यावतीने नायब तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 75 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. शासनाने अनेक वेळा आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली आहे. आता तरी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी. जातनिहाय जनगणना करण्यात यावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक मेढ्यातील नवीन बसस्थानक परिसरात उभारण्यात यावे. डोंगराळ भागातील शेतकर्यांना जनावरे चारण्यासाठी काही जमीन गायरान क्षेत्र म्हणून शासन दरबारी नोंद करावे. वन्यप्राण्यांकडून होणारे हल्ले आणि शेतीचे होणारे नुकसान याबाबत वन विभागाने तात्काळ मदत देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मोफत वसतिगृह उपलब्ध करून द्यावे.