उंब्रज – उंब्रज, ता. कराड येथे शुक्रवार, दि. 5 ते रविवार, दि. 7 या कालावधीत ‘ग्लोबल नॉलेज एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्यावतीने तीन दिवस भरगच्च कार्यक्रम, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक प्रदर्शन आणि कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेशकुमार जाधव यांनी दिली.
ग्लोबल एक्स्पोचे उद्घाटन आणि शाळेचे स्नेहसंमेलन शुक्रवार, दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजता रयत साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अभिनेता समृद्धी जाधव, यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. धनाजीराव काटकर, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन बळवंत पाटील, बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मणराव देसाई, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते उपस्थित राहणार आहेत.
फलटण येथील यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगावकर यांचे ‘शिक्षण व संस्कार’ या विषयावर व्याख्यान शनिवार, दि. 6 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. कृष्णा विश्वविद्यालयाचे विश्वस्त विनायक भोसले, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीता कदम, श्रीमती मंगल घोरपडे, रहिमतपूरच्या पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सौ. चित्रलेखा माने-कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यानंतर रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, दीपक साबळे यांचा ‘उत्सव ग्लोबलचा, सन्मान नारीचा’ कार्यक्रम आणि ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा होणार आहे.
रविवार, दि. 7 रोजी दुपारच्या सत्रात रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, पाककला स्पर्धा, डॉग शो, सायंकाळी ‘उत्सव ग्लोबलचा, सन्मान नारीचा’ आणि ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा होणार आहे. यावर्षीचा ‘ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार’ उरण-इस्लामपूरच्या प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक निशिकांत पाटील यांना उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता देण्यात येणार आहे. आमदार जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, खटाव-माण साखर कारखान्याचे को-चेअरमन मनोज घोरपडे, भीमराव पाटील, संपतराव माने, संपतराव जाधव, शंकरराव शेजवळ, योगराज जाधव, सुनंदा जाधव यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ नागरिक व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महेशकुमार जाधव यांनी केले आहे.