पिंपरी – बो-हाडेवाडी मोशी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 99 हजार 500 रुपये किमतीचा पाच किलो 990 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
मलिकजान शब्बीर बलगानूर (वय 24, रा. निगडी), गुनानिधी रतन साह (वय 29, रा. काळभोर नगर, चिंचवड. मूळ रा. ओडीसा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथे एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मलिकजान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख 99 हजार 500 रुपये किमतीचा पाच किलो 990 ग्रॅम गांजा, एक लाख 20 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण चार लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचा एक साथीदार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याच्या साथीदारालाही अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत