आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सातारा – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 100 खाटांच्या नवीन रुग्णालयासाठी साताऱ्यातील जुन्या दवाखान्यारची (गुरुवार पेठ) जागा द्यावी, या मागणीचे निवेदन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत रुग्णालयासाठी 35 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. या रुग्णालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या रुग्णालयासाठी एक एकर जागा आवश्यक आहे.
साताऱ्यात नवीन रुग्णालयाची उभारणी झाल्यास जिल्ह्यातील रुग्णांना लाभ घेता येईल. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुन्या दवाखान्याच्या चार एकर जागेपैकी एक एकर जागा नवीन रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात यावी. या संपूर्ण जागेची मालकी शासनाची असून, सध्या तेथे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, वैद्यकीय मोबाइल युनिट, पाणी प्रयोगशाळा व ईएसआय आदी शासकीय कार्यालये आहेत. दरम्यान, शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत तातडीने निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.