पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “इनोफेस्ट 2021′ मधील अंतिम टप्प्यात निवड झालेल्या स्टार्टअप ग्रुपसाठी तसेच प्राथमिक अवस्थेत स्टार्टअप असलेल्या कंपन्यांसाठी विद्यापीठाकडून “मेंटॉरशीप प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे.
यावर्षी घेण्यात आलेल्या इनोफेस्टमधील आय टू ई, पिच फेस्ट आणि हाकेथॉन या स्पर्धेतून निवड झालेल्या स्पर्धकांना याआधी प्री-इंक्युबेशन प्रोग्राममध्ये 30 स्टार्टअप ग्रुपला मेंटॉरशीप प्रोग्राम देण्यात आला होता. त्यांनतर आता पुन्हा त्यातून निवड झालेल्या 17 स्टार्टअपना विविध विषयांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्टार्टअपना वेळेवर सल्ला व मार्गदर्शन मिळाल्यामुळे योग्य दिशा मिळते. त्यामुळे स्टार्टअप अपयशी ठरण्याची शक्यता कमी होते. यासाठी विद्यापीठाकडून वेळोवेळी असे “मेंटॉरशीप प्रोग्राम’ घेण्यात येतात, विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ.अपूर्वा पालकर यांनी अशी माहिती दिली आहे.
या प्रोग्राममध्ये आर्थिक, उद्योग क्षेत्र, बाजारभाव, तांत्रिक तसेच कायदेविषयक क्षेत्रातील कुणाल सरपाल, आयआयटी मद्रासचे शिवा सुब्रमण्यम, आयआयटी मुंबई आणि स्टॅंडफोर्ड विद्यापीठाचे नीरज शहा, कौस्तव मुजूमदार, डेकीन डेनी अशा 20 तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश आहे. सहा महिन्यांसाठी हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्टार्टअपना संरचनात्मक पध्दतीने मार्गदर्शन करणाऱ्या काही निवडक केंद्रामध्ये विद्यापीठाचे हे केंद्र असून केवळ पुण्यातील नव्हे तर भारतातील अनेक विषयतज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यातील निवडक स्टार्टअपना महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून आर्थिक मदतही केली जाणार आहे, असे डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले आहे.