कराड – कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड- ढेबेवाडी मार्गावर भरधाव वेगात आलेल्या ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस व्हॅनने रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या चार तरुणांना उडवले. रविवार, दि. 22 रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. तसेच अन्य दोनजण या अपघातातून थोडक्यात बचावले.
सुजल उत्तम कांबळे (वय 17, रा. कोळेवाडी, ता. कराड) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर या अपघातास कारणीभूत ठरलेला ढेबेवाडी पोलीस ठाण्याचा चालक हवालदार शंकर खेतमर याच्यावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यात सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कुसूरमध्ये ऊसतोड मजुरांची टोळी आणण्यात आली होती. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास एका वाहनातून टोळी उतरत होती.
त्यावेळी कोळेवाडीतील चार युवक गप्पा मारत रस्त्याकडेला उभे होते. यावेळी कोळेवाडी बाजूकडून पोलीस व्हॅन ढेबेवाडीकडे भरधाव वेगाने निघाली होती. या पोलीस व्हॅनने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चार तरूणांना उडवले. या धडकेत सुजल कांबळेला गंभीर दुखापत होऊन त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातातून दोघे मात्र नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहेत. दरम्यान, या अपघातानंतर कुसूर येथील तरूणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. अपघाताची माहिती कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृत सुजलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. तर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस व्हॅनचा चालक हवालदार शंकर खेतमर याच्यावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.