सातारा -खंडेनवमीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी प्रतापगडावरील भवानी मातेचे विधीवत व पारंपारिक पद्धतीने पूजन केले. यावेळी सर्वांना आरोग्य, धनधान्य लाभू दे आणि सर्वत्र समृद्धी नांदू दे असे साकडे भवानी मातेला घातल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले. यावेळी गडावर विशेष होमहवनाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पारंपारिक सण साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी खा.उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून प्रतापगडावर जाऊन येथील भवानी मातेची विधीवत व पारंपारिक पद्धतीने पूजा केली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी काका धुमाळ उपस्थित होते. खंडेनवमीनिमित्त प्रतापगडावरील भवानी मातेचा परिसर मंडप टाकून सजवण्यात आला होता आणि परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
खा. उदयनराजे यांनी सकाळी साडेआठ वाजता भवानी मातेची पूजा केली. सातारा शहरातील शाही दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर खंडेनवमीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या भवानी मातेच्या पूजेला मोठे महत्त्व आहे. यंदाही पारंपारिक पद्धतीने मंत्रोच्चारामध्ये भवानी देवीचे विधीवत आवाहन करण्यात आले. यावेळी आयोजित हवन सोहळ्यातही खा. उदयनराजे यांनी सहभाग घेतला. पूजा झाल्यानंतर खा. उदयनराजे यांनी प्रतापगड आणि परिसराची पाहणी केली.
राज्य शासनाने प्रतापगड आणि किल्ले परिसरातील स्थळांचा विकास करण्यासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली असून त्याचे अध्यक्षपद खा. उदयनराजे भोसले यांना दिले आहे. त्या माध्यमातून परिसरात ऐतिहासिक स्थळांचा कसा विकास करता येईल यासंदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करून राज्यशासनाला सादर केला जाणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले आहे.