पुणे – दसरा अर्थात विजयादशमी हा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी दुर्गामातेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला, अशी कथा सांगितली जाते. तर, दुसऱ्या मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून माता सीतेला सोडवून आणले.
रावणाचा अंत करून म्हणजेच दृष्ट प्रवृत्तीचा अंत करून त्यावर विजय मिळवला, तो हाच दिवस म्हणूनच याला विजयादशमीही म्हटले जाते. याशिवाय पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर शमीच्या झाडावर त्यांनी लपवून ठेवलेली शस्त्र हाती घेतली तोही दिवस हाच आहे, अशी श्रद्धा आहे.
यंदा मंगळवारी (दि. 24) रोजी दसरा साजरा होत आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन आणि रावण दहनही केले जाते. या दिवशी शस्त्रांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सरस्वती पूजन, आपट्याची आणि शमीच्या पानांचे पूजन हे देखील या दिवसाचे महत्त्व आहे.
याशिवाय विजयादशमी असल्याने या दिवशी सीमोल्लंघन केले जाते. पूर्वी गावाच्या वेशीबाहेर असलेल्या आपट्याच्या किंवा शमी वृक्षाचे दर्शन घेऊन पुरुषमंडळी घरी परतत असत. त्यावेळी “सीमोल्लंघन करून आलात समुद्राच्या काठी, सोने टाका आमुच्या ताटी’ असे म्हणून सुहासिनी त्यांचे औक्षण करत असत. आता शहरातील मंदिरांमध्येच सीम्मोलंघनासाठी दर्शनाची व्यवस्था केली जाते.
यंदाची तिथी
यंदा आश्विन शुक्ल दशमी तिथी 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.44 वाजता सुरू झाली. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 03. 14 वाजता समाप्त होईल. यावर्षी रवि योग आणि दुसरा वृद्धी योगाचा विजयादशमीला संयोग आहे.