ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील सणबूर येथे गुरुवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरी झोपलेल्या स्थितीत मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ढेबेवाडी परिसरासह पाटण तालुका हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केली की, त्यांच्या मृत्यूमागे काही अन्य कारण आहे? याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून पोलीस तपासानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
आनंदा पांडुरंग जाधव (वय 75), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय 65), मुलगा संतोष आनंदा जाधव (वय 45, सर्व रा. सणबूर, ता. पाटण) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रुळ कोळे, ता. पाटण) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपासून आनंद जाधव आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांना उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना तिथून घरी सोडण्यात आले. तसेच रात्री सणबूर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. दरम्यान, लाईट नसल्यामुळे जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली होती. आजारी आनंद जाधव यांच्यासोबत पत्नी, मुलगा व मुलगी असे चौघेजण याठिकाणी होते.
दरम्यान, सणबूर येथील आनंद जाधव यांचे घर एका आडबाजूला आहे. विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच पुन्हा शुक्रवारी सकाळी त्यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी फोन उचलत नसल्याने त्याने शेजारील व्यक्तींना संपर्क करून घरी विचारपूस करण्यात सांगितले.
त्यानंतर काही लोक विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा बंद होता. घरातून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाची कडी तोडून आत जाऊन पाहिले असता चार जण अंथरुणावर मृतावस्थेत पडले असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती नातेवाईक व पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे.