सातारा – मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत दररोज हजारो नागारिकांची ये- जा असते. याच जिल्हा परिषदेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. मुख्य आवारातील नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून दुचाकी चोरीसह चंदन चोरीचेही धाडस चोरट्यांकडून होत आहे. जिल्हा परिषदेच्या सुरक्षिततेबाबत कोणालाच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
शासनाच्या विविध योजनांची जिल्हास्तरावर अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येते. जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातून हजारो नागरिक रोज येतात. या नागरिकांच्या व इतर कामकाजाच्या सुरक्षेची जबाबदारी झेडपीची आहे. मात्र, मुख्य आवारासह अन्य ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले काही सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. झेडपीच्या प्रवेशद्वाजवळ अधिकाऱ्यांची वाहने असून शेजारीच दुचाकी पार्किंग आहे. समोरील बाजूस उद्यान असून दोन्ही बाजूला गेट आहे.
याच ठिकाणासह इतर ठिकाणचे काही कॅमेरे बंद आहेत. झेडपीच्या मुख्य आवारात दोन महिन्यांपूर्वी कंत्राटदारांच्या मारहाणीची घटना घडली होती. मारहाणीच्या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे त्याचे फुटेज दिसले नाही. त्यामुळे झेडपीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तर चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत दुचाकी चोरी व चंदन चोरीचे धाडस केले आहे. काही संघटनांचे पदाधिकारी गेल्या काही महिन्यात वारंवार झेडपीत येऊन विविध कारणांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत.
झेडपीच्या दोन विभागाचे खातेप्रमुख व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झेडपी आवारात दोन महिन्यांपूर्वी वादीवादीची घटना घडली होती. यापुढे एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणचे कॅमेरे बंद असल्यास मोठी अडचण होणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही असल्याने याकडे संबधितांनी डोळेझाक करणे चुकीचे आहे. सद्यपरिस्थितीत जिल्हा परिषद आवारात नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक डोळ्यात तेल घालून काम करताना रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतींचा व निवासस्थानाचा परिसर मोठा असल्याने सर्व परिसरावर नजर ठेवणे त्यांना जिकिरीचे होत आहे.
32 पैकी 9 कॅमेरे बंद
जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीत एकूण 31 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामधील मुख्य आवारातील नऊ कॅमेरे बंद आहेत. कॅमेरे बसविल्यानंतर काही वर्षानंतर त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे असते. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. सीसीटीव्ही बंद असल्याचा फटका अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांनाही बसताना दिसत आहे.
Satara – Failure of “CCTV” in ZP on the path of thieves