सातारा – जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांप्रमाणे डिजिटल शिक्षण मिळत असून जिल्ह्यात झेडपीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आता ई- लर्निंगद्वारे शिकविले जात असून त्यासाठी तीन स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. या आधुनिक पद्धतीच्या शिक्षणामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांना डिजिटलच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरविता येत आहेत. जिल्ह्यातील 991 शाळांमधील 11 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा भौतिक व व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठी जिल्हा परिषद व बलवंत फाउंडेशनच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये तीन दिवस शिष्यवृत्ती व दोन दिवस इतर विषय शिकविले जात आहेत.
यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची निवड केल्याने विद्यार्थ्यांना तंतोतंत विषयाचे ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी या उपक्रमाचा प्रत्येक महिन्याला आढावा घेणार आहेत. ई- लर्निंगच्या माध्यमातून दुपारी तीन ते चार वेळेत स्मार्ट टीव्ही, एलईडी व स्मार्ट बोर्डद्वारे ऑनलाइन क्लास होत आहेत. पहिल्या टप्यात वाई, महाबळेश्वर व माण तालुक्यात स्टुडिओंची उभारणी करण्यात आली आहे. काही तालुक्यातील दुर्गम भागात नेटवर्कचा अडथळा वारंवार येत आहे. त्यासाठी त्या- त्या भागातील विद्यार्थ्यांना यु-ट्यूब लिंक पाठविली जात असून लिंकद्वारे त्यांना शिकविले जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही कुठलाही खंड पडत नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी सांगितले.