घराघरांत चैतन्याचे वातावरण; पहिल्या अभ्यंगस्नानाचा आनंद
वाई – प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावली उत्सवाच्या पर्वाला वाईसह तालुक्यात मोठया उत्साहात आरंभ झाला आहे. आज पहिली अंघोळ असल्यामुळे घराघरात चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले होते. पहिल्या अभ्यंगस्नानाचा घरोघरी उत्साह पाहयाल मिळाला. वाई शहर व परिसर दिव्यांच्या लखलखाटात उजाळून निघाले आहे. पहाटेपासूनच घराघरात लगबग दिसून येत होती. दिवाळीची धामधूम आता खऱ्या अर्थाने शिगेला पोहोचेली आहे. रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत लक्ष्मीपूजन मंगलमय वातावरणात संपन्न झाले.
वसुबारस, धनत्रयोदशीनंतर आता रविवारी दिवाळीची पहिली आंघोळ अर्थात अभ्यंगस्नान आले आहे. यंदा पहिल्या आंघोळीलाच लक्ष्मीपूजन आल्यामुळे फटाक्यांचा आवाजही वाढलेला होता. अवघे जनजीवन दीपोत्सवाने न्हाऊन गेले असून सर्वत्र दिवाळीचाच माहोल तयार झाला आहे. आजपासून खऱ्या अर्थाने फटाकांच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला. दरम्यान, दिवाळीच्या दिवशी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
वसुबारस, धनत्रयोदशी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा या सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा उत्सव आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झालेला दिसून आला. सलग सुट्या असल्याने येत्या काळात या उत्सहाला आणखी उधाण येणार आहे. घरोघरी दिवाळी फराळ बनविण्याची लगबग सुरूच आहे. लहानांपासून थोरामोठ्यांनिही बच्चे फटाके फोडण्याचा आनंद घेतला आहे.
प्रदुषण मुक्तीसाठी अनेक सामाजिक संस्था प्रबोधनपर कार्यक्रम राबवत असल्यामुळे प्रदुषणमुक्त फटाक्यांचा वापर करण्याचा प्रयत्न थोड्या प्रमाणात नागरिकांकडून होत आहे. वाईकर या दिवाळीचा पुरेपुर आनंद लुटताना दिसत आहेत. शहरात विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे वाई शहर झळाळून निघालं आहे.