पुणे – महापुरुषांच्या कर्तृृत्वाने, प्रेरणेने व विचाराने महाराष्ट्र समृद्ध, समर्थ व स्वयंपूर्ण झाला आहे. महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे ध्येय यशस्वीपणे अंगिकारले होते. यादृष्टीने “महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
महापुरुषांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन समिती गठीत करण्यात आली होती. गठीत समितीमार्फत पाच महापुरुषांच्या विचारांवर आधारीत “महापुरुषांचे कौशल्य विचार’ निदेशक हस्तपुस्तिका तयार करण्यात आली आहे, पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास मंजूरी मिळाली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय स्तरावर गठीत समितीने तयार केलेल्या 20 तासांच्या महापुरुषांचे कौशल्य विचार पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात समावेश करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हा तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. शिल्पनिदेशक पदावर नियमित असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम: अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. आवश्यकता असल्यास सद्यस्थितीत हा विषय हाताळणाऱ्या तासिका तत्वावरील शिक्षकांकडून अभ्यासक्रम शिकविण्यात यावा.
उपक्रमाचा उपयोग काय?
महापुरुषांच्या कौशल्य विषयक कार्याचा, धोरणाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासाठी समावेश केल्यास निश्चितच व्यवसाय शिक्षण अधिक समृद्ध होऊन विद्यार्थ्यांचे कौशल्य निपुण होण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.