सातारा – जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे 35 हजार डोस बुधवारी (दि.14) उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीअभावी मोहीम मंदावली होती.
जिल्ह्यात करोना लसीकरणाची मोहीम सुरु झाल्यानंतर सुरवातीला लसींचे डोस मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात 40 हजारांहून अधिक लसीकरण झाले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याला लसीचे अल्प डोस उपलब्ध होत होते.
जिल्ह्यात 18 वर्षांपुढील नागरिकांची 21 लाख लोकसंख्या असून त्यामधील 10 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी 50 टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या वाढत असली तरी अद्याप दुसऱ्या डोससाठी नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक 50 हजार लस जिल्ह्याला उपलब्ध झाली होती.
सातारा, फलटण, कराड, वाई या मोठ्या शहरांमध्ये ऑनलाइन बुकिंगनंतरच लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या माध्यमातून लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे.
करोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी केले.