पुणे -प्रवाशांच्या सोयीसाठी टप्प्याटप्प्याने पीएमपीमएलच्या सुविधांचे “डिजिटलायझेशन’ करण्यावर येत्या काळात भर दिला जाणार आहे. यामध्ये तिकिटाऐवजी स्मार्टकार्ड, बसच्या लाइव्ह माहितीसाठी जीपीएस ट्रॅकिंग यासह अन्य काही सुविधा आणि तक्रारींच्या नोंदीसाठी स्वतंत्र ऍप विकसित करण्याचा आमचा मानस असून, आगामी काळात ई-सुविधांचा अधिक विकास करण्याचा प्रयत्न असणार आहे.
अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पीएमपीएल अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मिश्रा यांनी बुधवारी पीएमपीएलच्या स्वारगेट मुख्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी पीएमपीएलच्या सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक (प्रभारी) दत्तात्रय झेंडे, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) सतीश घाटे उपस्थित होते.
यावेळी आगामी वाटचालीबाबत माहिती देताना मिश्रा म्हणाले की, पीएमपीएमएलच्या सेवा डिजीटल करण्यासाठी येत्या काळात पावले उचलण्यात येणार आहेत. ऍप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतील. प्रवाशांना आपल्या मार्गावरील बसचे लाईव्ह लोकेशन समजले पाहिजे. तसेच, बसमध्ये आल्यानंतर गुगल पे, क्यू. आर. कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची सोय मोबाइल फोनद्वारे कशी उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
…”पीएमआरडीए’ने संचलन तूट द्यावी
पुणे आणि पिपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात पुरविण्यात येणाछया बससेवेचा विस्तार आता पीएमआरडीए हद्दीपर्यंत करण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत याला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार महामंडळाने पीएमआरडीएच्या हद्दीत अनेक मार्ग देखील सुरू केलेले आहेत.
दरम्यान, पीएमपीएलला ज्याप्रमाणे दोन्ही महापालिकांकडून संचलन तूट देण्यात येते. त्याचप्रमाणे पीएमआरडीए प्रशासनाने देखील संचलन तूट द्यावी, याबाबत महामंडळाने पीएमआरडीएशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्याप यावर पीएमआरडीएकडून प्रतिसाद मिळालेला नाही, असे सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. केरूरे यांनी सांगितले.