सातारा – ‘मास’च्या प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अनेक नवीन उत्पादने, अद्यावत मशिनरी, व तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहता आले असून त्यातून भावी उद्योजक निर्माण होण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी पूरक बाब आहे. मासने या औद्योगिक प्रदर्शनामध्ये अनेक उपक्रमाचे आयोजन केल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देणारे हे प्रदर्शन माईलस्टोन ठरणार असल्याचे मत सातारकरांनी व्यक्त केले आहे. या चार दिवसाच्या प्रदर्शनात २० हजाराहून अधिक जणांनी यास भेट दिली आहे.
साताऱ्याच्या औद्योगिक क्षेत्रात स्वतःची उत्पादने असणाऱ्या उद्योजकांना चालना मिळावी, त्यांची उत्पादने जगाच्या बाजारपेठेत जावीत आणि साताऱ्याच्या उद्योग वाढीला गती मिळावी या उद्देशाने मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा मासच्यावतीने येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर दि. २१ ते २४ डिसेंबर अखेर मास औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात सातारा जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. यामध्ये किर्लोस्कर, कल्याणी, कुपर ग्रुपचे अनेक दशकांपासून देशाच्या औद्योगिक क्रांतीत सिंहांचा वाटा आहे. सातारा हे उद्योग वाढीसाठी उत्तम ठिकाण असून येथील मुबलक पाणी, पुण्यापासून जवळ, दळणवळणची सोय, अखंडीत वीज पुरवठा यामुळे सातारा हे राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होत असताना मेक इन सातारा हा ब्रँड प्रमोट करणे व साताऱ्याच्या उद्योग वाढीला गती देण्यासाठी मासने या प्रदर्शनाद्वारे मोठे पाऊल उचलले आहे.
या प्रदर्शनाचा प्रतिसाद पाहून यावर्षी मासने साताऱ्यात राष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक प्रदर्शन आयोजित केले. जिल्हा परिषदेच्या मैदानावर याठिकाणी तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील विविध भागातील उद्योजक, ट्रेडर्स, व्यावसायिक, इंजिनिअरिंग, आयटीआयचे विद्यार्थी तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक आणि कंपन्यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनासाठी भारत सरकारच्या लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाचे पाठबळ मिळाले आहे.
मासची स्थापना १९८७ साली उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आली. आपण आज उद्योगातून १३ हजार कोटी रुपयांची निर्यात करत आहोत. हे शक्तीस्थान आपण अधोरेखित केलेले आहे. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन उद्योजक व्हावे. साताऱ्यातील उत्पादने जागितक पातळीवर जाण्याचा हा प्रयत्न आहे. १५० हुन अधिक उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. जिल्हयातही इंटरनेशनल लेव्हलचे प्रोडक्ट असून हि अभिमानाची बाब असून सातारा उद्योगासाठी सर्वात सेफ आहे.
-राजेंद्र मोहिते, (अध्यक्ष मास सातारा)