सातारा – मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ सातारा यांच्या वतीने आयोजित केलेल्या धनंजय कूपर उद्यम नगरीतील औद्योगिक प्रदर्शनाला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या दोन दिवसांमध्ये 18 हजार उद्योजक आणि सातारकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सुमारे 165 पेक्षा अधिक सहभागी स्टॉल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची नवीन उत्पादने या निमित्ताने पहावयाला मिळाली. सोलर किटपासून मर्सिडीज बेंजपर्यंत आणि हायड्रोलिक जॅकपासून ते इलेक्ट्रॉनिक जनरेटरपर्यंत अशा विविध प्रकारच्या औद्योगिक वस्तूने सजलेल्या प्रदर्शनाचा सातारकर व नवउद्योजकांनी लाभ घेतला.
पाच जिल्ह्यातील उद्योजकांनी या प्रदर्शनाला प्रतिसाद दिला आहे अतिशय देखणी मांडणी, प्रदर्शनी भागामध्ये आकर्षक सजावट, औद्योगिक उत्पादनांची नेटकी मांडणी यामुळे मासच्या वतीने आयोजित प्रदर्शनाला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर दि. २१ डिसेंबरपासून मास औद्योगिक प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे. प्रदर्शनात विविध राज्यांतून विविध भागातील उद्योजक, ट्रेडर्स, व्यावसायिक, इंजिनिअरिंग, आयटीआयचे विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांनी स्टॉल लावले आहेत.
यामध्ये नवीन ट्रॅक्टर्सच्या मॉडेल्स कृषी क्षेत्रातील, सोलार पॉवरमधील, किचनमधील विविध मशिन्स बनविणाऱ्या कंपन्या, फायर सेफ्टी किटस्, मजुरांना लागणारी विविध सेफ्टी किटस्, बांधकाम क्षेत्रातील आवश्यक असणाऱ्या विविध यंत्रसामग्री, एफटीपी प्लँट, एच. आर. कन्सल्टन्सी, बँक ऑफ इंडिया अभियांत्रिकी महाविद्यालयांचेही स्टॉल लागले होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक नवउद्योजकांना विविध उत्पादनांची माहिती मिळाली.
यानिमिताने विद्यार्थ्यांनाही अनेक नवीन उत्पादने, अद्ययावत यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान पाहता येणार असल्याने प्रदर्शन पाहण्यासाठी अभियांत्रिकी, एमबीए यासह अनेक इतरही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनीही प्रदर्शनस्थळी गर्दी करत आहेत. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने उत्पादनांची माहिती घेत आहेत.