पुणे – महापालिकेकडून विकासकामांच्या नावाखाली केवळ वृक्षतोड केली जाते. मात्र,पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षवाढीसाठी काहीच केले जात नसल्याचा शिक्का आता महापालिका पुसणार आहे. शहरातील महापालिकेच्या माध्यमातून सुशोभिकरणाच्या नावाखाली केले जाणारे वृक्षारोपण रोखण्यासह, शहरात जास्तीत जास्त स्थानिक पर्यावरण, जागा, प्रूदूषण रोखणे तसेच पक्षाचा अधिवास वाढविण्याच्या अनुषंगाने शहरातील पदपथ, दुभाजक तसेच वाहतूक बेटांवर वृक्षारोपण केले जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे, या बाबतचीची विस्तारित मार्गदर्शक सूचना महापालिकेने २०१७ मध्ये शहरासाठीच्या केलेल्या पुणे शहर सायकल आराखडयात नमूद केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबाजवणी गेल्या सहा वर्षात झालेलीच नाही. त्यामुळे या सूचनांचा आधार घेत, महापालिकेकडून हे वृक्षारोपण केले जाणार आहे. याबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडून नुकतीच शहरातील वनस्पती तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली असून त्यांच्याकडूनही त्यास सहमती दर्शविण्यात आली आहे. विशेष म्हणजे भविष्यात भूसंपादनात ही झाडे तोडावी लागणार नाहीत याचाही विचार केला जाणार आहे.
अशी आहे वृक्षारोपण नियमावली
या सायकल आराखड्यातील मार्गदर्शक सूचनांमध्ये रस्त्याच्या कडेला कुठली झाडे, कशी लावावीत, त्यात कोणत्या झांडाचा समावेश असावा याची यादी असून या झाडांमुळे पदपथावर चालणार्यांना सलग सावली मिळेल,चौकात दुचाकींंना सावली मिळेल, अशा झाडांचा समावेश आहे. तर, या झाडांमध्ये अचानक फळे पडतील, काटे असतील, अशी झाडे न लावता. उपलब्ध जागा, वीज तारा तसेच पाण्याची भूजल पातळी पाहून लावणे शक्य असलेल्या झाडांची यादी आहे. तसेच, दुभाजकांवर रस्त्यांमध्ये लावली जाणारी झाडे, झुडपांचे निकष आणि अशा झाडांची यादीही देण्यात आली आहे. या शिवाय, वाहतूक बेटात लावण्याच्या झाडांची आणि रस्त्याच्या कडेला तसेच मध्ये कधीच कोणती झाडे लावू नयेत, याची यादीही देण्यात आली आहे.
“नागरिकांच्या सुविधांसाठी विकासकामे ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे, महापालिका केवळ वृक्षतोड करते, असा समज निर्माण झाला आहे. मात्र, या पुढे रस्त्याच्या कडेला, दुभाजक, तसेच वाहतूक बेटांमध्ये झाडांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करूनच ती लावली जाणार असून यात, स्थानिक पर्यावरण, भूजल पातळी, जागा, सावली, झाडाची वाढ, पक्षांची गरज या बाबी लक्षात घेऊन वृक्षारोपन केले जाणार आहे. यात प्रामुख्याने स्थानिक प्रजातींच्या वृक्षाचा समावेश आहे.” – दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग
या तीन रस्त्यावर होणार अंमलबजावणी
१: भाऊ पाटील रस्ता – बोपोडी
२ : पाषाण-सूस रस्ता
३ : जुना मुंबई- पुणे महामार्ग