कोरेगाव – “माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत “अमृत कलश’ यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी करा, या यात्रेतून प्रत्येक कुटुंबात, घराघरांत राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल असे नियोजन करावे, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगतेनिमित्त या उपक्रमाअंतर्गत कोरेगाव येथे अमृत कलश यात्रा शनिवारी सकाळी उत्साहात झाली.
त्याप्रसंगी आमदार महेश शिंदे बोलत होते. तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, गटविकास अधिकारी किशोर माने, जिल्हा बॅंकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर अमर जवान प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर कलश पूजन करण्यात आले.
त्यानंतर शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी गार्डन ते पंचायत समिती कार्यालय अशी अमृत कलश यात्रा काढण्यात आली. संपूर्ण देशात गावोगावची माती एकत्र करून त्याचे कलश देशपातळीवर जमा करण्यात येत आहेत आणि दिल्ली येथे अमृत रोपवाटिका तयार करण्यात येत आहे. याअंतर्गत कोरेगाव तालुक्यातील 142 गावांमधून कलशांमधून माती आणण्यात आली आहे. तालुकास्तरावर एक कलश एकत्रित करण्यात आला आहे.
पंचप्रण प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर शोभायात्रेमध्ये रोटरी उद्यानापासून पंचायत समितीपर्यंत कलश आणण्यात आला. यावेळी फिनिक्स स्कूल, सरस्वती विद्यालय, सरस्वती इंग्लिश मीडियम विद्यालय, डीपी भोसले कॉलेज, मॉडर्न हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषांमध्ये सहभाग घेतला. पंचायत समितीत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
सर्व शाळा, ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन किशोर माने, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नेहरू युवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहभाग नोंदवला. कृषी विभागासमोराल रोपवाटिकेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. विस्तार अधिकारी संजयकुमार बाचल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
=======================