शंभूराज देसाईंवरील आरोपाबद्दल नागरिकांचे पोलिसांना निवेदन
कोयनानगर – राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ललित पाटील ड्रग्स प्रकरणी बेछूट आरोप करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, ललित पाटील ड्रग्स प्रकरणाशी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा दुरान्वयानेही संबंध नसताना सुषमा अंधारे यांनी बेछूट व बेजबाबदारपणे आरोप केले होते. या प्रकरणाशी आपला तिळमात्र संबंध नसून त्यास मी ओळखतही नाही, हे स्पष्ट करून अंधारे यांनी केलेली वक्तव्ये मागे घ्यावीत, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले होते. मात्र, त्यानंतरही अंधारे यांनी आपली वक्तव्ये मागे न घेतल्याने शंभूराज देसाई यांनी वकिलांमार्फत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यात सुषमा अंधारे यांच्याविरोधात असंतोष पसरला आहे. त्यातूनच रविवार दि. 22 रोजी सर्वपक्षीय आणि सर्व जातीधर्मांतील कार्यकर्ते, नागरिक व महिलांनी पाटण पोलीस ठाण्यात एकत्र येत सुषमा अंधारे यांचा निषेध नोंदवला. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अंधारे यांनी केलेली बेछूट वक्तव्ये मागे घ्यावीत आणि शंभूराज देसाई यांच्यावर खोडसाळपणे आरोप केल्याबद्दल त्यांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जनतेत राहून प्रामाणिकपणे व कार्यक्षमपणे काम करणाऱ्या देसाई यांच्यावरील सुषमा अंधारे यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, असेही नागरिक व महिलांनी सांगितले. अंधारे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याबाबत पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतर पाटण पोलीस ठाण्यात सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.