सातारा – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी योगेश भीमराव देवकर (वय 30, रा. मोरे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा) यास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मंगळवार तळे परिसरातून काल (दि. 9) अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी, सातार्यातील मंगळवार तळे परिसरात योगेश देवकर हा संशयितरित्या फिरत असल्याची माहिती शाहुपुरी पोलिसांना मिळाली. त्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचला. संशयित देवकर तेथे आला असता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस, असा 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल सापडला. देवकर याच्यावर शस्त्र अधिनियमाच्या कलम 3 आणि 25 अन्वये शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साबळे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, ज्योतिराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे, सुनील भोसले यांनी ही कारवाई केली.