पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सरळसेवेद्वारे पात्र २५० उमेदवारांना महापालिका प्रशासकीय कामकाज, नियमांची अंमलबजावणी यासह शिस्तीचे धडे देण्यात येणार आहेत. सर्व उमेदवार रुजू झाल्यानंतर आणि लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार रुजू झालेल्या ६५ कर्मचा-यांसाठी खास प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध १५ पदांच्या ३८७ जागांसाठी मे महिन्यात ऑनलाइन परीक्षा घेतली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. त्यांना रूजू करून घेण्यास नोकर भरती निवड समितीने मंजुरी दिली आहे. त्यातील २१३ लिपिक तसेच, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार रूजू झालेल्या ६५ कर्मचा-यांना पुण्यातील कोथरूड येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध गटात विभागून उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण होताच लिपिकांना महापालिका प्रशासकीय सेवेत रूजू करून घेतले जाणार आहे.
महापालिका प्रशासकीय कामकाज, नियमांची अंमलबजावणी, शिस्तप्रिय वातावरणाचे धडे देण्यात येणार आहेत. तसेच, गणवेश कसा असावा. कार्यालयात येणारे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्याशी कसे बोलावे. त्यांच्यासोबत वर्तन कसे असावे, आदींबाबत उमेदवारांना मार्गदर्शन केले जाणार आहे, असे माहिती महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जाेशी यांनी सांगितले.
स्थापत्यच्या १४० अभियंत्यांचा सहभाग
महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे ४८ अभियंते, विद्युत विभागाचे १८ कनिष्ठ अभियंते, ७४ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा १४० कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना महापालिका क्षमता निर्माण आणि संशोधनासाठी मुंबईला पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी ४६ लाख ५८ हजार खर्च अपेक्षित आहे.