पुसेगाव – खटाव तालुक्यातील अल्पवयीन शाळकरी मुलास ब्लॅकमेल करून, त्याच्यावर दीड वर्ष अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पुसेगाव येथील “सोन्याचा अमृततुल्य चहा’ टपरीचा चालक अक्षय उर्फ सोनू दिलीप राऊत (वय 24, रा. शिक्षक कॉलनी, पुसेगाव) याच्यावर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि भादंवि कलम 377 व 506 अन्वये पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित मुलाने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय राऊत याने संबंधित मुलाला बोलावून घेऊन, तू इयत्ता 10 वीतील एका मुलीबरोबर इन्स्टाग्रामवरून बोलतोस, हे तुझ्या आणि त्या मुलीच्या वडिलांना सांगेन, असे धमकावले. संबंधित मुलाला ब्लॅकमेल करून, गेल्यावर्षी फेब्रुवारी ते यावर्षी सप्टेंबरअखेर या कालावधीत स्वत:च्या घरात आणि एका डॉल्बी सिस्टीमधारकाच्या घराशेजारी असलेल्या खोलीत बोलावून घेत वारंवार अनैसर्गिक अत्याचार केले. या प्रकाराचे व्हिडिओ तयार करून, त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाठवायला सांगितले, असे यासंबंधीच्या फिर्यादीत म्हटले आहे. सपोनि आशिष कांबळे तपास करत आहेत. दरम्यान, हा गुन्हा गंभीर असल्याने कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांनी तातडीने पुसेगाव पोलीस ठाण्यास भेट देऊन माहिती घेतली.