पुणे – ड्रग्ज तस्करी आणि नंतर त्यातील मुख्य आरोपी ललित पाटील याचे पोलिसांच्या तावडीतून पलायन यामुळे चर्चेत आलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयाची विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी झाडाझडती घेतली. या प्रकरणात विशेष चर्चेत आलेल्या “वॉर्ड क्र.16’चीही त्यांनी विशेष चौकशी केली.
ससून रुग्णालयात दीर्घकाळ उपचार घेत असलेल्या कैद्यांची माहिती यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतली. यानंतर डॉक्टरांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यांना 24 तासांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या अहवालानंतर मुक्काम ठोकलेल्या कैद्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. तर, तेथील रजिस्टर आणि दाखल असलेल्या रुग्णांची राव आणि डॉ. देशमुख यांनी माहिती घेतली.
ललित पाटील उपचाराच्या नावाखाली ससून सर्वोपचार रुग्णालयात तब्बल 16 महिने उपचार घेत होता. मागील तीन महिन्यांपासून तो सलग दाखल होता. दरम्यान, त्याच्याकडे सव्वादोन कोटी रुपयांचा एम.डी. अंमली पदार्थ सापडला. त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली. तर, दुसऱ्याच दिवशी ससून रुग्णालयाने ललित याच्या हार्निया शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. यासाठी एक्स-रेसाठी नेताना ललितने पळ काढला. ससून रुग्णालयाचा हा निर्णय संशयास्पद असल्याची चर्चा आहे.
24 तासांत अहवाल द्या; त्रिसदस्यीय समितीला आदेश
मुक्काम ठोकलेल्या कैद्यांची लवकरच कारागृहात रवानगी
सर्वच संशयीतांची चौकशी होईल : विभागीय आयुक्त
ससून रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक कैद्याच्या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती तपासणी करेल. त्यांच्या उपचाराबद्दलची सत्यता पडताळणी केली जाईल. तर, ललित पाटील पलायनप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासात आढळलेल्या प्रत्येक संशयितांची चौकशी होईल आणि कारवाई करण्यात येईल असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
अधिष्ठाता डॉ. ठाकूर अखेर बोलले…
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी या प्रकरणात आजवर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, विभागीय आयुक्तांसमोर प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर त्यांनी अखेर काही मुद्दे मांडत जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. डॉ. ठाकूर म्हणाले, “ललित पाटीलचा आजार सांगितला जाणार नाही, ही बाब गोपनीय आहे. त्याच्यावर सहा वैद्यकीय तज्ज्ञ उपचार करत होते. ड्रग्जप्रकरणी आमचा संबंध येत नाही. आम्ही फक्त उपचार करतो. ड्रग्ज प्रकरण पोलीस बघून घेतील.’ मात्र, हे सांगताना त्यांचा चेहरा घामाघूम झाला होता.