मुंबई – राज्यातील 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय (सायंकाळी 5 पर्यंतची आकडेवारीनुसार) प्राप्त झाला आहे. सत्तेसाठी काही पण म्हणून सर्वपक्षीय आघाड्यांनी सुद्धा 24 ठिकाणी विजय मिळवत मोठी मजल मारली आहे. राज्यातील बहुतांश नेत्यांनी आपापले बाजार समित्यांमध्ये गड राखले आहेत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय राजवट 19 वर्षांनी उठल्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. यापूर्वीच्या बाजार समितीच्या निवडणूक स्थानिक आघाडींवर झाल्या असल्या तरी यावेळी मात्र ही निवडणूक राजकीय गटागटात होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तर, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव ठकारे गट, शिवसेना (शिंदे) या पक्षांचे उमेदवार स्वतंत्र पॅनेल तयार निवडणूक रिंगणात उररले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कुत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला अवघ्या दोन जागा मिळाल्या तर सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 15 पैकी 13 जागा जिंकल्या.
सेवा सहकारी संस्थाच्या मतदार संघात 11 पैकी 11 जागा तर ग्रामपंचायत मतदार संघात चारपैकी दोन जागा जिंकल्या आहेत. या गटात मिळालेल्या दोन जागांवरच राष्ट्रवादीच्या पॅनेलला समाधान मानावे लागले. त्यामुळे हा पराभव म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसची बाजार समितीत पीछेहाट तर भाजपचा बाजार समितीमध्ये शिरकाव असल्याचे मानले
जात आहे.
माजी राज्यमंत्री शिवतारे, थोरात गटाला धक्का
पुणे -जिल्ह्यातील नऊ कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन धक्कादायक निकाल वगळता सात बाजार समितीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, तसेच दोन ठिकाणी महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दौंड बाजार समितीत भाजपाने प्रबळ राष्ट्रवादीला झुंजवित सामना बरोबरीत सोडविला आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे पॅनल चारीमुंड्या चीत झाले.
दौंडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल व भाजपा-मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनलने समसमान नऊ-नऊ जागा जिंकल्या आहेत. भाजपाने राष्ट्रवादीच्या सत्तेला खिंडार पाडले आहे. नीरा बाजार समितीत राष्ट्रवादीच्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवत 18 जागांवर विजय संपादन केला.
खेड बाजार समितीत राष्ट्रवादीच्या श्री भीमाशंकर सहकारी शेतकरी पॅनलने 18 पैकी 10 जागा जिंकत बाजी मारली. सर्वपक्षीय श्री भीमाशंकर सहकार शेतकरी परिवर्तन पॅनलला 6 जागांवर समाधान मानावे लागले. बारामती बाजार समितीत सर्व 18 जागा जिंकत राष्ट्रवादीने पुन्हा वर्चस्व अधोरेखित केले आहे. इंदापूर बाजार समितीत शेतकरी विकास पॅनलने विरोधी स्वाभीमानी शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवत 18 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. मंचर बाजार समितीत महाविकास आघाडी पुरस्कृत भीमाशंकर सहकारी पॅनलचे 17 उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते देवदत्त निकम हे विजयी झाले आहेत. वडगाव मावळ बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. भोरमध्ये कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पॅनलने 18 जागा जिंकल्या.