श्रीगोंदा – श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 11 जागा जिंकत माजी आमदार राहुल जगताप गटाने सत्ता हस्तगत केली. आमदार बबनराव पाचपुते आणि राजेंद्र नागवडे हे दोन्ही गट एकत्र येऊनही त्यांना सात जागांवर समाधान मानावे लागल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, मितेश नाहाटा यांचा पराभव जगताप गटाच्या जिव्हारी लागला.
शहरातील पंतनगर येथील सामाजिक केंद्रात काल मतमोजणी पार पडली. यामध्ये सेवा संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण सात जागांपैकी दीपक भोसले, अजित जामदार, नितीन डुबल, बाबासाहेब जगताप, भास्कर वागसकर हे जगताप गटाचे पाच उमेदवार विजयी झाले. तर आ. पाचपुते-नागवडेंना दत्तात्रय पानसरे आणि रामदास झेंडे यांच्या रूपाने दोन जागा मिळाल्या. महिला राखीव मतदारसंघात अंजली संदीप रोडे आणि मनीषा योगेश मगर या दोन्ही जगताप गटाच्या उमेदवार विजयी झाल्या. त्यांनी विरोधी गटाच्या सविता नलगे आणि सविता बारगुजे यांचा पराभव केला.
इतर मागास प्रवर्गात जगताप गटाच्या प्रविण उर्फ अतुल लोखंडे यांनी वैभव पाचपुते यांचा 115 मतांनी पराभव केला. विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदारसंघात जगताप गटाच्या दत्तात्रय गावडे यांनी विरोधी गटाच्या ज्ञानदेव खरात यांचा 70 मतांनी पराभव केला. ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारणच्या दोन जागांवर जगताप गटाचे साजन पाचपुते आणि पाचपुते गटाचे महेश दरेकर विजयी झाले. येथील मितेश नाहाटा यांचा पराभव जगताप गटाच्या जिव्हारी लागला.
अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघात नागवडे गटाच्या प्रशांत ओगले यांनी जगताप गटाच्या शंकर पाडळे यांचा 131 मतांनी पराभव केला. आर्थिक दुर्बल प्रतिनिधी मतदारसंघात पाचपुते गटाच्या लक्ष्मण नलगे यांनी जगताप गटाच्या देविदास शिर्के यांचा 140 मतांनी पराभव केला. व्यापारी व आडते मतदारसंघातील दोन्ही जागांवर लौकिक मेहता आणि आदिक वांगणे हे दोन्ही पाचपुते-नागवडे गटाच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. जगताप गटाच्या शिवाजी शेळके आणि अण्णा औटी यांचा पराभव झाला. हमाल- मापाडी मतदारसंघात जगताप गटाच्या किसन सिदनकर यांनी पाचपुते गटाच्या भाऊसाहेब कोथिंबीरे यांचा 7 मतांनी पराभव केला.