भवानीनगर, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील सणसर-रायतेमळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून काम इस्टिमेंटप्रमाणे होत नसल्यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी काम बंद ठेवण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
ग्रामपंचायत सदस्य धनंजय दुबळे, दीपक चव्हाण यांनी संबंधित विभागाला या रस्त्याच्या कामाबाबत तक्रार केली आहे. सणसर-रायतेमळा या रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून या रस्त्यावर काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम 28 टक्के बिलोने घेतल्यामुळे रस्त्याचे काम इस्टिमेट प्रमाणे करीत नसल्याचे धनंजय दुबळे यांनी सांगितले. रस्त्याचे काम दर्जेदार झाले पाहिजे जोपर्यंत रस्त्याचे झालेले काम इस्टिमेट प्रमाणे केले जात नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे तसेच बांधकाम विभागाच्या जिल्हा व तालुका अभियंत्यांनी हे काम एस्टिमेट प्रमाणे होत आहे का याची तपासणी करावी अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य दीपक चव्हाण धनंजय दुबळे, अशोक रायते, राजेंद्र रायते, रमेश रायते निखिल रायते, राजेंद्र नेवसे व ग्रामस्थांनी केली आहे.
काम असे व्हायला हवे
रस्त्याचे काम करत असताना ठेकेदाराने साडेतेरा फूट रुंदीने रस्त्याचे काम करायचे आहे. सुरुवातीला साडेतेरा फूट रुंदीने व अर्धा फूट जाडीने मुरूम भरावा करुन सुरुवातीचा मुरूम भरावा झाल्यानंतर सहा इंच जाडीने खडीकरण व त्यावर पुन्हा बारीक मुरूम टाकून रोलिंग करायचे आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा थर 4 इंच जाडीने खडीकरण व मुरमीकरण करायचे आहे. हे झाल्यानंतर चार इंची जाडीची पीसीसी करून पहिला थर द्यायचा आहे.
दुसरा थर आठ इंची जाडीचा द्यायचा आहे. या रस्त्यावर चार ठिकाणी पुलाचे काम असून पुलाचे काम करताना एका ठिकाणी दोन फुटी पाइप सात मीटर रुंदीचे व तीन ठिकाणी दोन फुटी पाइप सहा मीटर रुंदीचे वापरून चारही ठिकाणी पाईपच्या दोन्ही बाजूला काँक्रीटची भिंत बांधायची आहे.
काम असे होत आहे
अशा पद्धतीचे काम असताना पुलाच्या ठिकाणी ठेकेदाराने सुरुवातीला रस्त्याच्या खाली पाइप टाकून घेतल्या असून भिंती न बांधताच रस्त्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या भिंतीनंतर बांधल्यास त्या पाइपवर येणार नाहीत. ठेकेदाराने सध्या अर्धा फूट मुरूम भरावा न करताच खडीकरण केले आहे व त्यावर अत्यंत कमी प्रमाणात मुरूम पसरून रोलिंग केले आहे.
बर्याच ठिकाणी जुन्या रस्त्याची खोदाई न करता त्यावरच लेवल करून खडीकरण केले आहे. सुमारे 1600 मीटर लांबीचे रस्त्याचे काम असून यासाठी सुमारे एक कोटी 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत, 25 ते 30 वर्षांनंतर या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झालेला आहे.