वडापुरी (वार्ताहर) – सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे, अशा परिस्थितीत पाण्यासाठी विहिरी, बोअर घेण्याचे प्रमाण वाढले आहे. इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांकडून अनेक भागांत विहिरी खोदण्याची कामे सुरू आहेत. अलीकडे पोकलेनने विहिरी खोदण्याचे काम वेगाने होते. त्यामुळे विहिरींची खोदाईही वाढली आहे.
उजनी धरणाची पाणी पातळी उणे ४१ टक्क्यांपर्यंत गेली आहे. या परिस्थितीत पाण्यासाठी उजनी परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या जात आहेत. काही विहिरी पोकलेनने खोदल्या जात आहेत. मात्र, काही विहिरी क्रेनने खोदण्यात येत आहेत. ५० फुटांपर्यंत पोकलेन विहीर खोदण्याची सोय आहे.
मात्र, ५० फुटांपेक्षा जास्त खोल विहीर खोदायचे असल्यास क्रेनशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पाणीपातळी घटल्याने पन्नास फुटांपेक्षा देखील खोल विहिरी खोदण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोकलेनसह क्रेन व्यवसायिकांच्या व्यवसायानेही जोर धरला आहे. सध्या तालुक्यात क्रेनच्या साह्याने ५० फूट खोल व २५ फूट रुंद विहीर खोदण्यासाठी साधारणपणे साडेचार ते पाच लाख रुपये घेतले जात आहेत.
उजनीने तळ गाठला
उजनीने तळ गाठल्याने भीमा नदी कोरडी पडली आहे. यामुळे जनावरांचा चारा शेतातील पिके व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे विहीर व बोर खोदण्यासाठी शेतकरी प्राधान्याने लक्ष देत आहे.