मुंबई – “भाजपसोबत जाऊ या ,नाहीतर मला अटक होईल. असे म्हणत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते”, असा खळबळजनक दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळासह मीडियामध्ये देखील जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाकडून अद्याप याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या संदर्भात आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदेंवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘एकनाथ शिंदे माझ्याकडेही आले होते आणि आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते. मला अटकेची भीती वाटत आहे असं म्हणत होते, एकनाथ शिंदे यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं आहे.’ अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे जे म्हणाले तेच शिंदे यांनी मला देखील त्यावेळी सांगितलं होतं. मला तुरुंगात जायचं नाही. तुम्ही काहीही करा आणि आघाडी तोडा, अशी विनंती शिंदे यांनी केली होती. मी म्हटलं तुम्ही तुरुंगात का जाणार आहात? तुम्हाला तुरुंगात का पाठवणार? मी त्यांना वारंवार समजावत होतो आपण प्रसंगांना सामोरे जाऊ आपण लढणारे लोक आहोत आपण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत.’ असेही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना गौप्यस्फोट केला आहे.