मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पराभवाचे खापर अपक्ष आमदारांवर फोडले त्यात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचेही नाव होते. मात्र भुयार यांनी चक्क आपली भूमिका माध्यमांसमोर मांडून शिवसेनेवर आपली नाराजी व्यक्त केली.
संजय राऊत यांच्या आरोपानंतर देवेंद्र भुयार यांनी आपली भूमिका मान्सून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी ते आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी नंतर आता संजय राऊतांनी आपल्या आरोपावरून सपशेल माघार घेतली असल्याचे दिसून येत आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण देताना, “देवेंद्र भुयार मला भेटले. मी त्यांची भूमिका ऐकली, त्याचं म्हणणं ऐकलं. ते प्रामाणिकपणे बोलत होते, एवढंच मला वाटलं. त्यांच्या ज्या भावना आहेत, ते मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. त्यांच्याशी बोलताना वाटलं की ते खरं बोलत आहेत,” असे म्हटले आहे.
दुसरीकडे, संजय राऊतांनी थेट अपक्ष आमदारांची नावं घेतल्याने राज्यसभा निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “त्या माणसाला काय कळतं, त्यांनी नावापुढे डॉक्टर लावलं आहे, याची आधी चौकशी होणं गरजेचं आहे.”