मुंबई – एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेमध्ये फुट पडली. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. शिंदेंच्या बंडाला आज एक वर्षं पूर्ण झाले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्री 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केला होता. याला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली आहे. इतकेच काय तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 जून हा जागतिक गद्दार दिन जाहीर करण्याची मागणी पत्राद्वारे संयुक्त राष्ट्र संघटनेला (युनो) केली आहे.
संजय राऊत यांनी पत्रात काय लिहिले आहे ?
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने यासाठी 50 खोके घेतले त्यामुळे 20 जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असं संजय राऊत म्हणाले.
PUBLIC DEMAND!@UN@antonioguterres@UNinIndia @PMOIndia @UNICEFIndia @BJP4India @AUThackeray @unfoundation @UNHumanRights pic.twitter.com/OJ5qu28oY2
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 20, 2023
तर दूसरीकडे शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे. तर आदित्य ठाकरेंनी आजचा दिवस जागतिक खोके दिवस साजरा करावा असे आदेश दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही 20 जून गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता एकाच दिवशी विविध पक्षाकडून वेगळ्यावेगळ्या पद्धतीने आजचा दिवस साजरा केला जाणार आहे.