मुंबई – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांनाहीं दगा देतील आणि ते राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये सामील होतील, असा आरोप भाजपचे नेते नितेश राणे यांनी केला आहे. आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊत 10 जून रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
10 जून हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा स्थापना दिन असतो त्या संदर्भात त्यांनी हे विधान केले आहे. संजय राऊत यांचा अजित पवारांना विरोध असून अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्यास राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावाही राणे यांनी केला. संजय राऊत यांनी अजित पवारांना नेहमीच विरोध केला आहे. संजय राऊत यांचा उल्लेॅख राणे यांनी साप असा केला.
ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे काम संजय राऊत हे करीत आहेत. दरम्यान नितेश राणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे म्हणाले की, अशी विधाने करण्यासाठी त्यांना पैसा मिळतो.