शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी पुन्हा संजय राऊत; उद्धव ठाकरेंचा मित्रपक्षांना ‘हा’ संदेश !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत तणाव आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर राऊत टीका करत आहेत. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आज शिवसेनेने जाहीर केलेल्या प्रवक्त्यांच्या यादीत राऊत यांना मुख्यप्रवक्तेपदी कायम ठेवण्यात आले आहे. या फेरनियुक्तीमुळे राऊत यांची भूमिका हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचा संदेशच शिवसेनेने मित्रपक्षांना दिल्याची अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी स्थापन करण्यात संजय राऊत यांची मोठी भूमिका होती. राऊत यांचे शरद पवार यांच्याशी असलेले चांगले संबंध सर्वश्रूत आहे. मात्र राऊत यांच्याकडून करण्यात येत असलेल्या टीकांमुळं महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होत आहे. तरी देखील उद्धव ठाकरे यांनी मुख्य प्रवक्तेपदी पुन्हा राऊत यांची नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून संजय राऊत काँग्रेस नेतृत्वावर टीका करत आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसनेते आक्रमक झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तर राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख अपघाताने गृहमंत्री झाल्याचं म्हटलं होतं. त्यावरून अजित पवारांनी राऊत यांच्यावर टीका केली होती.

एकूणच महाविकास आघाडीतील तणावपूर्ण वातावरणामुळं राऊत यांची शिवसेनेच्या मुख्यप्रवक्तेपदी फेरनिवड होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र राऊत यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी असलेली भूमिका हीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे, हे शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना अप्रत्यक्षरित्य संदेश दिल्याचं दिसून येत आहे.

शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन नियुक्ती)
अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन नियुक्ती)
मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन नियुक्ती)
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन नियुक्ती)
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन नियुक्ती)
किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन नियुक्ती)
संजना घाडी (नवीन वर्णी)
आनंद दुबे (मुंबई) (नवीन नियुक्ती)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.