गोव्यात विरोधी बाकावरच बसण्याची कॉंग्रेसची भूमिका
मुंबई : महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही त्यांनी केला होता. परंतु त्यांच्या वक्तव्याला तासही उलटत नाही तर कॉंग्रेसनेच त्यांना मोठा झटका दिला आहे. आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याचे गोवा कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे.
गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचेही ते म्हणाले होते. परंतू, आता गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचे गोवा कॉंग्रेसने म्हटले आहे. तसेच कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणे पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
आमच्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण संपले असून सध्या गोव्याच्या राजकारणात व्यस्त आहोत असे संजय राऊत म्हटले होते. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही फ्रंट उभा केला जात आहे. गोव्यात ज्या प्रकारे सरकार निर्माण केले आहे ते सर्वांना माहिती असून हे आमच्यावर टीका करतात, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
गोव्यात 40 पैकी 30 आमदार हे भाजपाच्या बाजूने आहेत. त्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावर बसू, असे चोडणकर यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासने तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणे बंद करा, असा टोला भाजपा नेते विनय तेंडुलकर यांनी राऊत यांना लगावला.