‘सिंधू’ मालिकेचे 100 भाग पूर्ण, सेटवर कलाकारांची धम्माल

मुंबई  – फक्त मराठीवरील ‘सिंधू’ या मालिकेने १०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने सेटवर खास सेलेब्रेशन करण्यात आलं. सिंधू मालिकेनं नुकताच १०० भागांचा पल्ला गाठला. शतकपूर्तीचा सोहळा मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून साजरा केला.

दरम्यान, सोशल मीडियावरूनही सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले आपापले अनुभव लिहत हा आनंद शेअर केला. संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याची भावना फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी व्यक्त केली.


‘सिंधू…एका सामान्य मुलीची असामान्य कथा’ ही एकोणिसाव्या शतकातील सिंधू या चिमुरड्या निरागस मुलीची उत्कट कथा आहे. यात तिचा आयुष्यातील खडतर प्रवास विशेषतः शैक्षणिक मिळवण्यासाठीची धडपड दाखवण्यात आलाय. टिपिकल सास-बहू ड्रामाला तडा देत ‘सिंधू’ ही काल्पनिक मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरत आहे.

त्यातच स्वातंत्र्यापूर्वीचं एकोणिसाव्या शतकातील वातावरण, आचार-विचार, केशभूषा, वेशभूषा, वाडे अशा अनेक निराळ्या गोष्टी यात बघायला मिळत आहेत. बालकलाकार अदिती जलतारे सिंधूची भूमिका साकारत असून तिच्यासोबतच श्रीहरी अभ्यंकर, वेद आंब्रे, सौरभ सुतार, वंशिका इनामदार असे आणखीनही चिमुकले कलाकार आहेत.

त्यांसोबतच गौरी किरण, पूजा मिठबावकर, शाश्वती पिंपळीकर, प्रसाद दाबके, निकिता कुलकर्णी, नचिकेत जोग, मिलिंद पेमगिरीकर असे अनेक कलाकार या मालिकेतून महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. सिंधू मालिकेची संकल्पना श्रीरंग गोडबोले अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची असून त्यांच्याच इंडियन मॅजिक आय कंपनीतर्फे या कलाकृतीची निर्मिती होत आहे. विभावरी देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले यांच्या या सुंदर कथेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्नील मुरकर सांभाळत आहेत.

सध्या सुरु असलेल्या ट्रॅकमुळे सिंधू मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली असून, मालिकेतील ट्विस्ट बघता येत्या काळात नेमकं काय होणार याचं कुतूहल अनेकांमध्ये पाहायला मिळतंय. अल्पावधीतच प्रेक्षकांनी फक्त मराठीच्या या मालिकेला भरभरून प्रेम व सकारात्मक प्रतिसाद दिला.

याचं मोठं श्रेय मालिकेतील कलाकारांना जातं. सिंधूमधील कलाकारांसह सर्व बालकलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. मालिकेचा पुढील प्रवास आणखीन उत्कंठावर्धक होणार असल्याचे दिसून येईल.  नुकतंच मालिकेत एक महत्त्वाची घटना घडली आहे? त्यानं सिंधूच्या आयुष्यात यापुढे काय होणार? हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.