अयोध्या : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत येण्याला तीव्र विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची आज खास भेट होणार आहे. शरयू नदीकाठी आज संध्याकाळी सात वाजता दोन्ही नेत्यांची भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बृजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच खासदार संजय राऊत देखील अयोध्येत पोहोचले आहेत. आज संध्याकाळी बृजभूषण सिंह यांची शरयू किनारी भेट होणार आहे. शरयूच्या काठी सोमवारी संजय राऊत पाहणी करत असताना बृजभूषण सिंह देखील तिथे उपस्थित होते. मात्र दोघांची भेट होऊ शकली नव्हती. परंतु आज दोन्ही नेत्यांच्या भेटीची वेळ ठरली आहे. आज संध्याकाळी शरयूची महाआरती होईल, तेव्हा तिथे त्यांची भेट होईल. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होणार याची उत्सुकता आहे.
दरम्यान, माझा विरोध राज ठाकरे यांना आहे, ठाकरे कुटुंबाला नाही. त्यामुळे राज यांच्या आई, पत्नी किंवा कुटुंबातील कोणीही अयोध्येत आलं तर मी स्वत: त्यांचं आदरातिथ्य करेन. परंतु राज ठाकरे यांना माझा विरोध कायम आहे. माफी मागत नाही तोपर्यंत राज ठाकरेंना विरोध कायम राहिल, असे बृजभूषण यांनी म्हटले होते.