मुंबई – बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला लीलावती रुग्णालयातून आज डिस्जार्च देण्यात आला आहे. श्वासोच्छ्वास करताना त्रास होत असल्याने संजय दत्तला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संजय दत्तला रविवारी सायंकाळी अचानक श्वास घेताना त्रास जाणवू लागल्याने लीलावतीमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर त्याची तातडीने करोना चाचणीही करण्यात आली. ती निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज त्याला घरी सोडण्यात आले. प्रसिद्ध छायाचित्रकार विराल भयानी यांनी संजय दत्तला डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली.
दरम्यान, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद! असे ट्विट संजय दत्तने त्याच रात्री केले होते.