मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस धनंजय मुंडे यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे.
रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. तसेच माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे त्यांनी आभार व्यक्त केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल असे ते म्हणाले.
दरम्यान, तीन जानेवारीच्या मध्यरात्री धनंजय मुंडे यांच्या कारला परळी येथे अपघात घडला होता. यावेळी त्यांच्या छातीला जखमा झाल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर 16 दिवसांच्या उपचार करण्यात आले.