सांगली (प्रतिनिधी)- सांगली आणि गव्हाण (ता. तासगाव) येथील दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या सांगलीमध्ये करोनाबाधितांची संख्या ४५ वर पोहचली असून यापैकी १३ जणांवर मिरज करोना रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
सांगलीतील रेव्हेन्यू कॉलनीमध्ये मुंबईमधून आलेल्या एकास करोनाची लागण झाली होती. त्याला मिरज आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच्या संपर्कातील २१ जण बुधवारी सायंकाळी निगेटिव्ह आले होते. परंतु संबंधित व्यक्ती ज्या घरात थांबली होती, त्या घरातील महिलेस करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गुजरातमधून साळशिंगेमध्ये आलेल्या करोनाबाधिताच्या सोबत आलेल्या तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील एकास करोनाची लागण झाली आहे. या दोघांवर मिरज करोना रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
सांगलीत करोना बाधितांची संख्या ४५ इतकी झाली असून यामधील ३१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर १३जणांवर मिरज करोना रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.