नवी दिल्ली :- भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरुद्ध आंदोलनात सहभागी झालेली भारतीय महिला कुस्तीपट्टू संगीता फोगटने हंगेरीत बुडापेस्टमध्ये सुरू असलेल्या जागतिक रॅंकिंग सिरीज कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले आहे.
एक महिन्यापेक्षाही जास्त काळ आंदोलनात सक्रिय राहिल्यावर, तसेच त्यामुळे सरावासाठी अत्यंत कमी वेळ मिळालेला असतानाही संगीताने केलेली ही कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहे.
संगीताने 59 किलो वजनी गटात ही कामगिरी केली. संगीताला पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात तिने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. तरीही उपांत्य फेरीत तिला पराभव पत्करावा लागल्याने ब्रॉंझपदकावर समाधान मानाव लागले. संगीताने गेल्या वर्षी 62 किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते.
देशातील जनतेकडून मला अभिनंदनाचे संदेश मिळत आहेत. तुम्हा सर्वांचे खूप आभार. हे पदक केवळ माझे नसून त्या सर्व संघर्ष करणाऱ्या महिलांना अर्पण करते, ज्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढत आहेत, असे संगीताने म्हटले आहे.
आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंपैकी एक विनेश फोगटने आयत्या वेळी या स्पर्धेतून माघार घेतली. विनेशने प्रकृती ठीक नसल्याने स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगितले होते.