शिर्डी – साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर महसूल मंत्री विखे पाटील यांनी बैठक घेऊन मध्यस्थी केल्याने अखेर या वादावर पडदा पडला. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर परिसरात चपलांवर बंदी राहील. चपला नसल्याने भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने सर्व प्रवेशद्वाराजवळ चप्पल स्टॅड व मॅंट बसण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मंत्री विखे पाटील यांच्या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले .
साईसंस्थान प्रशासन व शिर्डी ग्रामस्थांनी समन्वय ठेवण्याबरोबरच साईसंस्थान प्रशासनाने शिर्डी ग्रामस्थांना साई मंदिराच्या प्रवेशद्वारातून सन्मानपूर्वक प्रवेश देण्याबरोबरच साईमंदिरातही पूर्वीप्रमाणे ग्रामस्थांना नंदी गेटने प्रवेश देण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
शिर्डी ग्रामस्थ आणि साईसंस्थान प्रशासन वादाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने ग्रामस्थ व प्रशासन यांची एकत्रित बैठक संस्थानच्या सभागृहात घेतली. साईसंस्थानचे सीईओ पी. शिव शंकर, उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, शिवाजी गोंदकर, विजय जगताप, मनसेचे दत्ता कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, विलास कोते, नितिन कोते, ऍड. अनिल शेजवळ यांच्यासह शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीपूर्वी एक तासभर विखे पाटील यांनी साई संस्थानचे सीईओ व निवडक ग्रामस्थांशी स्वतंत्र बैठक घेऊन दोन्ही बाजू समजावून घेतल्या. त्यानंतर ग्रामस्थांच्या बैठकीत महसूलमंत्री दाखल झाले. ग्रामस्थ, अधिकारी यांच्या भावना समजावून घेऊन साई संस्थान अधिकारी यांनी कामकाजात सुधारणा करावी, ग्रामस्थांना मंदिर परिसर येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा विविध सूचना मंत्री विखे यांनी करत ग्रामस्थ व साई संस्थान प्रशासन यांच्यातील होणाऱ्या वादावर सकारात्मक चर्चा घडवून पडदा टाकला. शिर्डी ग्रामस्थांनी साई संस्थान सुरक्षा रक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराबाबत बैठकीत तक्रारींचा पाढा वाचला.