Sandeep Kshirsagar : राज्यात काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा उपोषण सुरु केले होते त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. त्यात बीडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा उफाळून आली होती. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलं होती. एवढंच नाही तर त्यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला होता. क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयावर झालेला हल्ला हा मराठा आंदोलकांनी केल्याचा आरोप काहींनी केला होता. परंतु, हा आरोप स्वतः आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेटाळला आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे. याविषयी बोलताना त्यांनी, तो हल्ला काही समाजकंटकांनी केला होता. मराठा समाजाचा या हल्ल्याशी काही संबंध नाही. हा प्रकार चुकीचा आहे. माझं घर बीड शहरात आहे. शहरात इतर नेत्यांचीदेखील घरं आहेत. बीडमध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकानांची तोडफोड झाली. त्या व्यापाऱ्यांनी आणि सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की, या हल्ल्याशी आंदोलकांचा काही संबंध नाही. मीदेखील प्रामाणिकपणे हेच सांगेन की त्या हल्याशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही.
क्षीरसागर काका-पुतण्यांच्या घर आणि कार्यालयावर झालेल्या हल्ल्यापाठोपाठ माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरही दगडफेक झाली होती. तसेच त्यांच्या घराबाहेरील गाड्यांची जाळपोळ झाली होती. हा हल्ला मराठा आंदोलकांनी केल्याचा आरोप सुरुवातीला करण्यात आला. परंतु, पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ८ जण हे मराठा नाहीत, अशी माहिती स्वतः आमदार प्रकाश सोळंके यानी दिली. तसेच सोळंके म्हणाले, माझ्या राजकीय विरोधकांनी आणि काही समाजकंटकांनी हा हल्ला केला होता.