मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात पहाटेपासूनच आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे दिसत आहे. आज पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आले आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आले. तर दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रीपासूनच राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
यातच एक वाजताचे नमाज पठण असून त्याआधी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही पोलीस ताब्यात घेणार होते. मात्र राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्ताबाहेरून देशपांडे हे पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याचे समोर आले आहे. यावेळी एक महिला कर्मचारी जखमी झाली आहे.
दरम्यान, टीव्ही वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये महिला पोलीस खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याचं दिसून येतं. खाली पडलेल्या या महिला पोलीसला तेथे उपस्थित पोलिसांनी तात्काळ धाव घेत उठवल आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे आता संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, ठाण्यात मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनिटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केले. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.