टाकवे खुर्द येथे तहसीलदार, आरोग्य अधिकाऱ्यांनी केली पाहणी; महावीर हॉस्पिटलतर्फे रुग्णवाहिका
कार्ला – मावळ तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पाचशेच्या वर रुग्ण संख्या झाली आहे. तालुक्यात कोविड सेंटर वाढवण्याची तयारी सुरू असून, याबाबत कार्ला येथील टाकवे खुर्द येथील समुद्रा महाविद्यालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तेथील प्राथमिक सुखसुविधांचा आढावा घेण्यासाठी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह मावळ आरोग्य अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून आढावा घेतला.
मावळ तालुक्यात दररोज करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुढे रुग्णसंख्या वाढू शकते. याकरिता तळेगाव, वडगाव, लोणावळा या ठिकाणी करोना क्वारंटाइन कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लोणावळा परिसरातील रुग्णांसाठी हे सेंटर सुरू होणार आहे, त्यासाठी तेथील रूम व्यवस्था, पाण्याची सोय, किती खाटा उपलब्ध आहेत. कशाप्रकारे प्राथमिक सुखसुविधा त्याठिकाणी उपलब्ध होऊ शकतील, याची पाहणी करण्यात आली.
तसेच कामशेत येथील महावीर हॉस्पिटलचे डॉ. विकेश मुथा यांच्या वतीने कोविड सेंटरमधील करोना रुग्णांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या वेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह मावळ आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, आरोग्य अधिकारी गुणेश बागडे, मायमरचे डॉ. दिलीप भोगे, डॉ. ताराचंद कराळे, डॉ. विकेश मुथा, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. अमोल आग्रवाल, डॉ. सीमा शिंदे, डॉ. अजित माने, कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे, तलाठी मीरा बोऱ्हाडे, संजय राऊत, उदय कांबळे, दिलीप राठोड, पोलीस पाटील संजय जाधव, प्रतीक पिंगळे, कोतवाल कांबळे, शुभम मावकर, शिवाजी म्हाळस्कर, संतोष हुलावळे आदी उपस्थित होते.