बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; 60 बेडची व्यवस्था; पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरात तीन करोना बाधित सापडल्यानंतर महापालिकेची यंत्रणा अधिक सजग झाली असून बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोध मोहिम सुरू आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या आणखी 41 संशयित रुग्णांचे “स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल आल्यानंतर बाधितांची संख्या स्पष्ट होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या स्वाक्षरीने एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, बुधवारी रात्री शहरातील तिघांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना लागण झाली आहे, त्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. भोसरी येथील महापालिका रुग्णालयात “करोना’ व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी तातडीने 60 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये, महिला आणि पुरुष वर्गासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून शुक्रवारी सकाळी महापालिका पदाधिकाऱ्यांनी याबाबतीत पाहणी केली. सध्या भोसरीच्या या स्वतंत्र कक्षात तीन करोना पॉझिटिव्ह आणि संशयित असे रूग्ण दाखल करण्यात आले असल्याची माहिती आयसोलेशन कक्षाचे प्रमुख डॉ. शंकर जाधव यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी शुक्रवारी सकाळी या स्वतंत्र कक्षाची पाहणी केली. यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.
सध्या वायसीएममध्ये असलेल्या करोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांना येथे हलविण्यात आले आहे. त्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. सध्या भोसरी येथील कक्षात 10 जणांना दाखल करण्यात आले आहे. तपासणीसाठी स्वत:हून आलेल्या तसेच महापालिकेच्या पथकांनी केलेल्या पाहणीनुसार रेफर करण्यात आलेल्या रूग्णांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर गरज असेल तरच आयसोलेशन कक्षात दाखल केले जात आहे.
तशा प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची गरज नसेल तर “होम क्वारंटाईन’चा अर्थात घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. भोसरी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर सुसज्ज आतिदक्षता कक्ष करण्यात आल्याने नागरिकांनी घाबरून न जाता स्वत:हून काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
होम क्वारंटाईनचा सल्ला
पिंपरी चिंचवड शहरामध्ये 231 जणांनी महिन्याभरात परदेशवारी केल्याची माहिती समोर आली आहे. तपासणी पथकांच्या माध्यमातून परदेशवारी केलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. जर्मनीची परदेशवारी करून आलेले दोन नागरिक तपासणी पथकाच्या माध्यमातून समोर आले. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना कोणताही त्रास नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना “होम क्वारंटाईन’चा सल्ला
देण्यात आला असल्याचे डॉ. शंकर जाधव यांनी सांगितले.