करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय ः मुख्यमंत्र्याची विधान परिषदेत माहिती
पिंपरी -दहावी, बारावीच्या परीक्षा वगळता पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, चित्रपटगृहे, मॉल्स, नाट्यगृहे व व्यायामशाळा बंद ठेवण्यात येणार आहे. याची अमंलबजावणी शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षा वगळता इतर शाळा बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत सांगितले.
करोनाचा प्रादुर्भाव शहरामध्ये वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन रुग्णांना करोना विषाणूची लागण झाल्याचे तपासणी अहवालात सिद्ध झाले आहे. परदेशातून आलेल्या एकाला करोना विषाणूची बाधा झाली. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या 10 झाली आहे. तर राज्यामध्ये हा आकडा 17 वर पोहचला आहे. राज्यात करोनाच्या विषाणूने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे उपाययोजना म्हणून शहरातील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स व नाट्यगृहे बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना शक्य तेवढे काम घरुनच करण्यासाठी “वर्क फॉर्म होम’ची मुभा द्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड शहरासह पुणे शहरातील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरामध्ये महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या 105 शाळा आहेत. तसेच माध्यमिक 18, उर्दू माध्यम 14, हिंदी 2 व इंग्रजी माध्यमाच्या 2 शाळा आहेत.
सुमारे 40 हजार विद्यार्थी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. तर खासगी 528 शाळा आहेत. या सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शहरामध्ये तीन मोठी नाट्यगृहे आहेत. चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर व भोसरी येथे अंकुश लांडगे नाट्यगृह आहे. हे तीनही नाट्यगृहे बंद ठेवण्यात येणार आहे. शासकीय कार्यक्रमांवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात राज्यातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना या विषाणूची लागण तात्काळ होण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील चित्रपटगृहांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. नागरिकांनी एकत्र येऊन करोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी ते बंद ठेवण्यात
येणार आहेत.