सातारा – गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून शेख यांनी साताऱ्यात धडक कामगिरी बजावली होती. पुन्हा एकदा साताऱ्याच्या ग्राउंडवर शेख यांची बदली झाली. मावळते एसपी अजय कुमार बंसल अजूनही बदलीच्या प्रतीक्षेत आहेत
गृहमंत्रालयाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश निघाले होते यामध्ये अजय कुमार बंसल यांची बदली प्रस्तावित ठेवण्यात आली असून गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक यांना साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे रात्री उशिरा पोलीस मुख्यालयांमध्ये या बदलीचे आदेश प्राप्त झाले. अजय कुमार बंसल यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी साताऱ्याचे एसपी म्हणून गडचिरोली येथूनच पदभार स्वीकारला होता. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल 149 जणांना जिल्ह्यातून तडीपार केले होते.
तसेच संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढत 85 जणांना तुरुंगात पाठवले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तब्बल 328 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याच कार्य काळामध्ये जिल्हा नियोजन मंडळातून १०५ वाहनांसाठी पोलिसांना निधी मिळाला आणि ती वाहने तपास कामासाठी पोलिसांना उपलब्ध झाली. महिला सुरक्षा प्रदर्शित प्रकल्पाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालेले उदघाटन चर्चेचा विषय ठरला.
रात्री उशिरा बन्सल यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले. मात्र, सध्या त्यांची बदली प्रस्तावित ठेवण्यात आली आहे. गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
समीर शेख साताऱ्यात एस पी म्हणून उद्या पदभार स्वीकारणार आहेत.