गेलॉंग – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक ( T20 WorldCup ) क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी श्रीलंकेने नेदरलॅंडचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंका संघाने या स्पर्धेच्या सुपर 12 गटांतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मर्यादित 20 षटकांत 6 गडी गमावून 162 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना नेदरलॅंडचा डाव 20 षटकांत 9 बाद 146 असा रोखला गेला. श्रीलंकेच्या डावाची सुरुवात पाथुम निसांका व कुशल मेंडीस यांनी धडाक्यात केली. मात्र, निसांका पुन्हा एकदा स्थिरावल्यावर बाद झाला. मेंडीसने मात्र चौकार व षटकारांची आतषबाजी करत वर्चस्व राखले. त्याने अवघ्या 44 चेंडूत 79 धावांची खेळी करताना 5 चौकार व 5 षटकार फटकावले. त्याला साथ देताना चरिथा असालंकाने 31 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
#T20WorldCup । यूएई संघाने नामिबियाला ७ धावांनी पराभूत केले; दोन्ही संघ वर्ल्डकपमधून बाहेर
विजयासाठी 163 धावांचा पाठलाग करताना नेदरलॅंडनेही चांगली सुरुवात केली. मात्र, विक्रमजीत संग, कॉलिंग ऍकरमन यांनी निराशा केली. सलामीवीर मॅक्स ड्वोडने एक बाजू सांभाळताना 71 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 3 षटकार फटकावले. कर्णधार स्कॉट एडवर्डसने 21 तर टीम कुपरने 16 धावा केल्या. अन्य फलंदाजांचे अपयश नेदरलॅंडला भोवले व त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 3 तर महीश तिक्षणाने 2 बळी घेतले. या विजयासह श्रीलंका सुपर 12 गटात जवळपास दाखल झाला आहे. पात्रता फेरीतील गटात आता त्यांनी चार गुण मिळवत सरस रनरेटच्या आधारे अव्वल स्थान मिळवले आहे.
उद्याचे सामने
1) वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड
वेळ ः सकाळी 9ः30 पासून
2) स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे
वेळ ः दुपारी 1ः30 पासून
ठिकाण ः होबार्ट, ऑस्ट्रेलिया
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टस